सुधाकर जाधव, जालना
जालना जिल्ह्यातील अंतरवाली जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आंदोलन करत होते. या मराठा आक्रोश मोर्चाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केला. यामुळं आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस घेऊन जात होते.
त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालून जरांगे पाटील यांना रुग्णालयात घेवून जाण्यास प्रतिकार करून पोलिसांवर दगडफेक करून पोलिसांना गंभीर जखमी केले आहे. तसेच, पोलिसांची एक कार जाळून टाकली आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि. ३०७, ३३३, ३३२, ३५३, ४२७, ४३५, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे करीत आहेत