दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची (Sidhu Moosewala) काल पंजाबच्या मानसा शहरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पंजाबमध्ये (Punjab) खळबळ निर्माण झाली आहे. पंजाब सरकारने 424 लोकांची सुरक्षा काढल्याच्या 24 तासानंतर ही घटना घडली आहे. यामुळे पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर सुद्धा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पंजाब पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या घटनेशी संबंधीत असलेल्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अनेकांची चौकशी केली जातेय. तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. यादरम्यानच एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी संबंधीत असलेल्या लॉरेन्स बिष्णोईने आता या प्रकरणाची धास्ती घेतल्याची माहिती समोर येतेय. बिष्णोईने आता पटयाला न्यायालयात याचिका दाखल केली असून, पंजाब पोलिसांकडून आपला फफेक एन्काऊंटर होऊ शकतो अशी भीती त्यानं व्यक्त केली आहे.
दुसरीकडे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत मदत करणाऱ्यांना उत्तराखंडमधील डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून, पंजाब पोलीस संबंधितांना घेऊन रवाना झाल्याचं सांगितलं जातंय. हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये तो लपला होता. पंजाब आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला ताब्यात घेतले. संशयिताला आता पंजाबला नेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची चौकशी ही सीबीआय आणि एनआयए सारख्या केंद्रीय यंत्रणांकडून व्हावी अशी मागणी त्यांच्या वडीलांनी केली होती. त्यानुसार पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील कुटुंबाकडून करण्यात आली आहे.