औरंगाबाद : आफताबसारख्या घटनांचा विचार करताना त्यात कृत्य करणाऱ्याची जात न पाहता आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या आफताब प्रकरणाला राजकीय रंग दिला जातोय? याबाबत विचारले असता खासदार जलील म्हणाले, या घटनेला जो कोणी जबाबदार आहे, त्याची जात पाहण्यापेक्षा तो माणूस तरी आहे का? हे समजून घेतलं पाहिजं. कारण असं कृत्य करणाऱ्याला माणूस म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. ही घटना म्हणजे जनावरांपेक्षा सुद्धा भयानक असं कृत्य आहे. कारण अशा प्रकरणांध्ये जात पाहता कामा नये, कारण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. आपल्या देशात जातीप्रमाणे कायदा बदलत नाही, असंही जलील यांनी सांगितलं.
जलील म्हणाले, आमची मागणी आहे की, ज्याने कुणी हे कृत्य केले त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे की, यातून दुसऱ्यांना धडा मिळायला हवा. सध्या देशामध्ये कायदा अजून कडक करणे आवश्यक आहे. देशात कायद्याचा धाक राहिल्या नसल्याने अशा घटना वाढत चालल्या आहेत, अशी खंत देखील जलील यांनी बोलून दाखवली. निर्भया प्रकरणावेळीत संपूर्ण देश मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरला होता. मात्र संसदेत यावर चर्चा होणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते. महिलांच्या संरक्षणाचा विचार करता आपण कोणते कायदे करू शकतो? यावर विचार व्हायला हवा. आज आम्ही संसदेज जातो तेव्हा बहिष्कार टाकला जातो किंवा संसद तहकुब केली जाते. पूर्णवेळ संसद चालतच नाही. कायदे त्या ठिकाणी बनणे अपेक्षित असताना देखील तसे होत नाही, असंही जलील म्हणाले.
जलील म्हणाले, देशातील हिंसाचाराच्या घटनांचा वाढता क्रम पाहता देशात लवकरात लवकर यावर चर्चा व्हायला हवी. नवीन कायदे बनवले गेले पाहिजे. तसेच जर कायदे बनले तर ते अंमलात आणले गेले पाहिजे. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहे. लोक बेरोजगारीने त्रस्त आहेत. त्यामुळे मोहन भागवतांसारख्या लोकांनी या मुख्य मुद्द्यांवर बोलावे. फालतू गोष्टींवर बोलूच नये, कारण त्यावर प्रतिक्रिया देण्यास वेळ नसल्याचं देखील जलील यांनी आवर्जून सांगितलं