निसार शेख, चिपळूण
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी - ठाकूरवाडी आदीवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याने अनेकांचे जीव गेले. अजुनही अनेक कुटुंबे दरडीखाली गाडली गेली आहेत. या पार्श्वभुमीवर तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येथील लोकांचे तात्पुरते पुर्नवसन होण्यासाठी ग्रामीण भागात २६ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरडग्रस्त भागात लक्ष ठेवण्यासाठी १८ नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून १८ पथके तयार केले आहेत.
दोन दिवसांपुर्वी तालुक्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. अतीवृष्टीमुळे काही ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या असून काही गावांमध्ये यापुर्वी पडलेल्या भेगा देखील रूंदावल्या आहेत. मात्र आता या भेगांचे प्रमाण आणखी वाढले आहे. या गावांतील ग्रामस्थांना जून अखेरला प्रशासनाने स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र त्यानंतरही ग्रामस्थांनी गाव सोडले नाही. अजुनही त्यांच्यापुढे स्थलांतर नेमके करायचे कोठे असा प्रश्न कायम आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील आदीवासी पाड्यात डोंगर कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची घडली. याघटनेमुळे चिपळूण प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरडीचा धोका असलेल्या तालुक्यातील १३ गावांमधील ३६ वाड्यांतील लोकांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये पेढे कुभांरवाडी, परशुराम घाटमाथा, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंदफणसवाडी, भेंद-धनगरवाडी, गंगेचीवाडी, तिवडीतील राळेवाडी, उगवत वाडी, भटवाडी, रिक्टोली येथील इंदापुर वाडी, मावळतवाडी, मधलीवाडी, बौध्दवाडी, देऊळवाडी, नांदिवसे मधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी, कादवड धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई - धनगरवाडी, धामनदी - धनगरवाडी, बुरंबवणेवाडी, खेंड-धनगरवाडी, कळकवणे येथील रांगी धनगरवाडी, खलीफा धनगरवाडी, कोळकेवाडी मधील खारवार- धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी, बोलाडवाडी, पिंपळी बुद्रुक, कुभार्ली येथील लांबेवाडी, पेढांबेतील दाभाडी, रींगी धनगरवाडी, येगाव येथील ढोकबाव सुतारवाडी, कळंबट गवळीवाडी आणि गोवळकोट बौद्दवाडी व मोहल्ला अशा गावांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे -पाटील व एनडीआरएफच्या पथकाने कादवड व तिवडी येथील दरडीचा धोका असलेल्या वाड्यांना भेटी दिल्या. तेथील ग्रामस्थांना सुरक्षीतस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले. यावेळी पथकप्रमुख बी.बी. पाटील, भास्कर कांबळे, मिलींद केळसकर, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील उपस्थित होते.