अमझद खान |कल्याण : गणोशोत्सवाच्या आधी खड्डे बुजविले जाणार असा दावा केडीएमसीने केला होता. मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाहीत. कल्याणमध्ये आम आदमी पार्टीकडून रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले तर डोंबिवलीत मनसेकडून महापालिकेस सज्जड दम दिल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजविले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्या आधी खड्डे बुजविण्याकरीता 15 कोटी 15 लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. 13 ठेकेदारांना कामे दिली गेली. शहरातील रस्त्यातील अनेक विभागांर्गत येतात. त्यामुळे सर्व प्रभाग अधिकाऱ्यानां खड्डे बुजविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या होत्या. या खड्डय़ामुळे एकाचा मृत्यू तर काही लोक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. गणोशोत्सवाआधी खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले होते. खड्डे बुजविण्याची सुरुवात झाली. पण अनेक ठिकाणी अद्याप खड्डे तसेच आहेत. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील अक्षरा पटेल आपच्या या पदाधिकाऱ्याच्यां नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले. तर डोंबिवलीत गोग्रासवाडी परिसरात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी विसजर्नाआधी खड्डे बुजविले पाहिजेत असा इशारा दिला होता. त्याठिकाणीही महालिकेकडून खड्डे बुजविले गेले. या दोन्ही घटनेनंतर एकच गोष्ट लक्षात येते की, रस्त्यावर अजूनही खड्डे कायम असून राजकीय पक्षांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे.