Bangladesh Women vs India Women T20 Series : सिलहटमध्ये खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाचा ७ विकेट्सने पराभव करून ३-० ने मालिका विजय मिळवला. बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करून २० षटकात ८ विकेट्स गमावून ११७ धावा केल्या होत्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने १८.३ षटकात ३ विकेट्स गमावून १२१ धावा केल्या आणि बांगलादेशला पराभूत केलं. भारताच्या शेफाली वर्माने ३८ चेंडूत ५१ धावा केल्या. शेफालीला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बांगलादेशच्या सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. सलामीवीरांनी ४६ धावांची भागिदारी केली. यामध्ये मुर्शिदा खातूनने ९ धावांचंच योगदान दिलं. तर दुसरी सलामीवीर दिलारा अख्तरने २७ चेंडूत पाच चौकार ठोकून ३९ धावांची खेळी केली. कर्णधार निगार सुल्ताना आणि सोभना मोस्ट्रीने तिसऱ्या विकेटसाठी ३० धावांची भागिदारी केली. बांगलादेशची धावसंख्या ८५ वर पोहोचल्यावर सोभना १५ धावांवर असताना बाद झाली. तर फाहिमा खातूनला भोपळाही फोडता आला नाही. तर निगारने २८ धावांची खेळी केली.
शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाचा धमाका
बांगलादेशने दिलेलं धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने चांगली सुरुवात केली. भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये ५९ धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी रचली. शेफालीने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली आणि ३८ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीनं ५१ धावा कुटल्या. तर स्मृती मंधानाचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. स्मृतीने ४७ धावा केल्या. दयालन हेमलताने ९, कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ६ आणि रिचा घोषने नाबाद ८ धावा करुन संघाला १९ व्या षटकात विजय मिळवून दिला.