नवी दिल्ली : भारतीय चलन रुपयामध्ये (Indian Rupee) ऐतिहासिक घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून रुपयांमध्ये सातत्याने घसरण होत असून नवा विक्रम स्थापित करत आहेत. पहिल्यांदाच अमेरिकन चलन डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाने 80 रुपयांची पातळी ओलांडली आहे.
2022 वर्षात आतापर्यंत रुपया 7 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. प्रमुख चलनांमध्ये डॉलर सततच्या मजबूतीमुळे रुपयाची स्थिती कमकुवत होत आहे. जवळपास दोन दशकांनंतर, डॉलर आणि युरोचे मूल्य समान झाले आहे. तर, भारतीय रुपया डिसेंबर 2014 पासून आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत सुमारे 25 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हंटले होते की, कच्च्या तेलांच्या सतत वाढणाऱ्या किंमती आणि रशिया-युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून युध्द सुरु आहे. याच्या परिणामास्तव रुपयामध्ये घसरण होत आहे. केवळ रुपयांच नव्हे तर ब्रिटिश पाउंड, जापानी येन आणि यूरो सारख्या चलनांमध्येही घसरण होत आहे, असे त्यांनी सांगितले.
महागाई आणखी वाढणार?
भारतात अनेक वस्तू आयात केल्या जातात. यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. रुपयाची घसरण सुरु राहिल्यास आयात वस्तूंवर जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. म्हणजे आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठी देखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. रिफाइंड ऑईल, मोबाईल आणि लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात.
दरम्यान, बदलत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर मंदीचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेतील महागाई 41 वर्षांच्या उच्चांकावर आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्ह वेगाने व्याजदर वाढवत आहे. महागाईच्या ताज्या आकडेवारीनंतर अमेरिकेतील व्याजदरात एक टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत वाढत्या व्याजदराचा फायदा डॉलरला मिळत असल्याने परदेशी गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून डॉलर खरेदी करत आहेत. या घटनेमुळे अनपेक्षित पद्धतीने डॉलर मजबूत होत आहे.