नवी दिल्ली : जागतिक स्तरावर भारतासाठी एक चांगली बातमी येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकत टॉप फाईव्हमध्ये स्थान मिळवले आहे. आता अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्या पाठोपाठ भारताचा नंबर लागला आहे.
कोरोना महामारीला मात देत भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर मागील चार तिमाहीपेक्षा अधिक होता. याचे प्रमुख कारण म्हणजे कृषी आणि सेवा क्षेत्राची भरीव कामगिरी. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास वाढला असून गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत झाली आहे.
एका अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर १३.५ टक्के राहिला आहे. त्याच वेळी, ब्लूमबर्गच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2021 च्या शेवटच्या तिमाहीत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
अमेरिका ही सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन, त्यानंतर जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. दशकभरापूर्वी या यादीत भारत ११व्या क्रमांकावर होता आणि ब्रिटन पाचव्या क्रमांकावर होता. परंतु, आता भारताने ब्रिटनला मागे टाकले असून दुसऱ्यांदा हा पराक्रम केला आहे. याआधी 2019 मध्येही भारताने ब्रिटनला सहाव्या स्थानावर ढकलले होते.
भारताने नुकतेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर १३.५ टक्के होता. रोख रकमेच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्था मार्च तिमाहीत 854.7 डॉलर अब्ज होता. तर यूकेची अर्थव्यवस्था 816 डॉलर अब्ज होती.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीतही भारताची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. या आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे.
तर, आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ म्हणाले की, ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन सुमारे 1.4 लाख कोटी रुपये आहे. हे अर्थव्यवस्थेतील तेजीचे संकेत देत आहे. स्थिर भांडवल निर्मिती एप्रिल-जूनमध्ये 34.7 टक्क्यांनी वाढली. ही 10 वर्षांतील सर्वोच्च वाढ आहे.