सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचा नफा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटरमागे 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून यासंदर्भात केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना निर्देश दिले जाऊ शकतात, अशी माहिती आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तेल कंपन्यांना सुमारे 75 हजार कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी तेल कंपन्यांनी काही प्रमाणात इंधनाचे दर कमी करावे, असा दबाव सरकारकडून तेल कंपन्यांवर टाकला जाऊ शकतो.
सरकारी OMC ने एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर मे महिन्यात केंद्र सरकारने करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. 2022-23 च्या संपूर्ण आर्थिक वर्षाशी तुलना केल्यास चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नफ्यात 4,917 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत भरीव निव्वळ नफा कमावला आहे. यावेळी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 10 रूपयांनी स्वस्त होवू शकते. त्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे.
कच्च्या तेलाच्या कमी किमती आणि उच्च सकल शुद्धीकरण मार्जिन (GRM) यामुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुलै-सप्टेंबर या तिमाहीत रु. 5,826.96 कोटी नफा कमावला होता. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ने सप्टेंबर तिमाहीत 8,244 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. दुसरीकडे, IOCL चा निव्वळ नफा 12,967 कोटी रुपये होता. याचा अर्थ तिन्ही कंपन्यांचा निव्वळ नफा 27,038 कोटी रुपये होता.
दरम्यान, तिसऱ्या तिमाहीत हा नफा 75 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत तिन्ही कंपन्यांचा एकत्रित नफा 57,542.78 कोटी रुपये आहे. तसेच, पहिल्या तिमाहीत किती अधिक नफा झाला, या तिन्ही कंपन्यांचा नफा दुसऱ्या तिमाहीत आणखी कमी झाला, असा ट्रेंड दिसून आला आहे.