लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून सर्वच पक्षांत जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. जलील म्हणाले, चंद्रकांत खैरे साहेबांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना शुभेच्छा देतो. ते खूप वर्षांपासून प्रतीक्षेत होते. तिकीट मिळणार नाही, म्हणून ते काही दिवसांपासून घाबरले होते. खैरे साहेब पुन्हा हिरवा भगवा करू नका. हे सोडून लढू आणि लोकशाही मार्गाने लढू.
जलील माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, खैरे साहेब म्हणजे मी आहे तर, मीच आहे असे करतात. अनेकदा ते म्हणतात, हे किरकोळ आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोलताना जलील म्हणाले की, अमित शहा आले होते. कमळाला दिल्लीत पाठवायचं आहे. एमआयएमला हद्दपार करायचं आहे, असं ते म्हणाले होते. मग ह्यांना उमेदवार घोषित करायला वेळ का लागतो आहे, हे मला कळत नाही. कदाचित आमचं जमत नाही, म्हणून ते येथील उमेदवारी शिंदे गटाला देत आहेत. भाजप फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारतात. लोकांना आकडे सांगून फसवण्याचं काम ते करतात. आम्ही काही ठिकाणी चांगल्या उमेदवारांना समर्थन देऊ शकतो. पक्षाला नाही.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर बोलताना जलील म्हणाले, जरांगे यांनी ताकद दाखवून दिली आहे. त्यांना आमचा पाठिंबा हवा असेल, तर आम्हीही देऊ शकतो. वंचित महाविकास आघाडीसोबत जाईल, असं म्हटलं होतं. परंतु, आम्हाला विश्वास होता की, ते बाळासाहेबांना सोबत घेणार नाहीत. त्यांना ग्राऊंड लेव्हलचा पक्ष नको आहे. जरांगे यांना सुद्धा अशाच प्रकारे डावललं जात आहे.