संदीप जेजुरकर| नाशिक : सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला असून आजपासून दिवाळीच्या काळात लाखोच्या संख्येने सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 24 तास दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसत असून गडावर देखील भाविकांची रीघ दिवसेंदिवस वाढत आहे. नवरात्रीनंतर राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान दिवाळी उत्सव कालावधीत देखील गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती - श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे आजपासून रविवार दि. 13 नोव्हेंबरपर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. तसेच दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालयाना सुट्टी असून इतरही सरकारी कार्यालयात विकेंड असल्याने पर्यटनाला वेग आला आहे. दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, नवरात्र उत्सवात व कोरोना काळात दर्शनासाठी येवू न शकलेले भाविक सुट्ट्यांच्या कालावधीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी मंदिर हे 24 तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येत आहे.
शिवाय भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना सप्तश्रृंगी देवी दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे. दरम्यान आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू असेल असे नियोजन करण्यात आले आहे.