IMD Alert For Satara District : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून साताऱ्यात संततधार सुरुच आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळांवर जात असतात. परंतु, रिल काढण्याच्या नादात किंवा मौज मजा करताना काही पर्यटक आपला जीव धोक्यात टाकतात. परंतु, आता या पर्यटकांचे धाबे दणाणणार आहेत. कारण भारतीय हवामान विभागाने १ ते ५ ऑगस्ट दरम्यान सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. साताऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील- लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसच जीवीतहानी आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी नागरिकांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये आदेश दिले आहेत.