झारखंड केडरच्या 2000 बॅचच्या आयएएस (IAS)अधिकारी पूजा सिंघल (pooja singhal)यांच्या झारखंड-बिहारसह सात राज्यांतील 20 ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ed)छापे टाकले होते. त्यानंतर त्यांची बुधवारी कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सिंघल यांना अटक करण्यात आली. सिंघल यांच्याकडे ईडीने टाकलेल्या छाप्यात 25 कोटी रुपयांची रोकड सापडली होती.
पूजा सिंघल सध्या खाण सचिव आहेत. ईडीने पूजा यांचे सासरे कामेश्वर झा यांचे मुजफ्फरपूरचे घर, दिल्लीत आई-वडिलांचे घर तसेच कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही छापे 7 मे रोजी छापे टाकले होते. त्यानंतर 11 मे रोजी ईडीने त्यांची अनेक तास चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांना उत्पन्नापेक्षा जास्त संपती जमवल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली.
२१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस
पूजा सिंघल फक्त २१ वर्षे ७ दिवस एवढे वय असताना पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाल्या होत्या. त्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या राहिल्या, मग अर्जुन मुंडा असो, रघुवर दास असो की हेमंत सोरेन. कमी वयात आयएएस झाल्याने त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै २०३८ पर्यंत आहे. त्या केंद्रात उच्च पदापर्यंत जाऊ शकत होत्या, असे मानले जात आहे. पण वादात राहिल्याने अन् आता ईडीच्या कारवाईनंतर त्या अडचणीत आल्या आहेत. त्यांनी १९९९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी विवाह केला. २००४ मध्ये हजारीबागमध्ये राहुल उपायुक्त आणि पूजा एसडीओ होत्या. तेथे पती-पत्नीत वाद झाला. अखेर घटस्फोट झाला. २०१० मध्ये पूजा यांनी डॉ. अभिषेक झा यांच्याशी विवाह केला. अभिषेक यांचे रांचीत आलिशान रुग्णालय आहे. माजी सीएम रघुवर दास यांच्या कार्यकाळात ३५ हजार युवकांना नियुक्तिपत्र दिल्याने त्यांचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदले गेले आहे.