बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगाचा हात असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी याविषयीचा खुलासा केला आहे. या हत्येच्या तपासात बिश्नोई गँग असल्याचे समोर आले आहे. शूटर्सच्या जबाबानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहचली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे, सलमान खान याच्यावर दहशत बसवणे हाच उद्देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे आता सलमानच्या जीवालाही धोका वाढल्याने पोलिसांचे टेन्शन अधिकच वाढल्याचं दिसतंय.
लॉरेन्स बिष्णोई गँग आणि सलमान खान यांच्यामधील वादाला कारणीभूत हे काळ्या हरणाची म्हणजे काळविटाची शिकार आहे. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं आणि त्या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. या प्रकरणी ५ एप्रिल २०१८ रोजी सलमान खानला हरणाची शिकार केल्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन दिवसांनी त्याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं. दोन दिवसांनंतर त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून बाहेर आला. यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग मात्र सलामान खानवर प्रचंड नाराज झाली.
हरणाच्या शिकार प्रकरणात सलमान खानला अलीकडेच न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर बिश्णोई टोळीने सलमानला धमकी दिली होती. तसेच हरणांची पूजा करणारा बिश्णोई समाजही सलमानवर संतापला.
राजस्थानमधील बिष्णोई समाज हा निसर्गदेवतेला पूजणारा समाज मानला जातो. वृक्षतोड असो वा इतर पर्यावरणीय वाद असो, शेकडो वर्षांपासून हा समाज निसर्गाचा आदर करतो आणि त्याच्या विरोधातील कृत्यांच्या विरोधात ठामपणे उभा राहतो. काळे हरिण हे बिष्णोई समाजात पवित्र मानले जाते, त्याला देवाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे सलमानने दोन काळ्या हरिणांची हत्या केल्यानंतर माफी मागावी अशी मागणी लॉरेन्स बिष्णोई यांने केली होती. पण सलमान खानने माफी मागितली नाही आणि त्यामुळेच लॉरेन्स बिष्णोई त्याच्या जीवावर उठला आहे.
2018 मध्ये, लॉरेन्स बिश्नोई पहिल्यांदाच सलमान खान आणि ब्लॅक बक प्रकरणात दाखल झाला, ज्याने तोपर्यंत गुन्हेगारीच्या जगात चांगले नाव कमावले होते. बिश्नोई समाजातून आलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानचा काळवीट शिकार केल्याचा बदला घेणार असून त्याला जिवंत सोडणार नाही,अशी घोषणा केली. 2022 मध्ये गायक सिद्धू मूसवाला खून प्रकरणात लॉरेन्सचे नाव आहे. तेव्हापासून तो तुरुंगात असला तरी सलमान खानला विसरलेला नाही. सलमानवर हल्ला झाला. त्याच्या वडिलांनी सलीम खान यांना धमकी दिली आहे.