हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. अदानी ग्रुपच्या विरोधात हिंडनबर्गने सादर केलेल्या अहवाला संदर्भात सुनावणी पार पडणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सेबी आणि अर्थ मंत्रालयास देखील या सर्व प्रकरणासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यामुळं आज केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडते हे पाहणं महत्त्वाचे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या सर्व प्रकरणासंदर्भात १३ जानेवारी पर्यंत उत्तर मागितले होते. अदानी समुहाविरोधात हिंडनबर्गच्या अहवालाशी संबंधित 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहे. वकील एम एल शर्मा आणि विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत अमेरिका स्थित हिंडेनबर्गने अदानींचे शेअर्स शॉर्ट सेल केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही लोकसभेत यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. उद्योजक गौतम अडानी यांच्याविरोधात हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपानंतर प्रकरण चांगलेच तापले होते.