नुकताच केंद्रिय निवडणूक आयोगाकडून गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर या दोन्ही राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी भाजपाने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह 40 जणांचा समावेश असणार आहे.
68 जागांसाठी उमेदवार घोषित
हिमाचल प्रदेश विधानसभेत एकूण 68 जागा आहेत. भाजपने आतापर्यंत 68 उमेदरांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत 62 तर दुसऱ्या यादीत सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे नावही दुसऱ्या यादीत नाही.
अशी होईल निवडणूक
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. त्याची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली होती. 25 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.