अहमदनगर | सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला सुपारी घेऊन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पंधरा हजार रुपयांत कुलकर्णी यांना संपवून टाकण्याची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या कटातील अक्षय विष्णू सब्बन, चैतन्य सुनील सुडके यासह एक अल्पवयीन अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय आणि सनी जगधने हे दोघे फरार आहेत. यातील चैतन्य सुडके याच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय सब्बन याची सीताराम सारडा शाळेजवळ पानटपरी होती. या टपरीला मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी हरकत घेतली. त्यांच्या तक्रारीवरून महापालिकेने टपरी हटविली होती. त्यामुळे पोलिसांचा सब्बन याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, तो माहिती देत नव्हता. सीसीटीव्हीत हल्लेखोरांचे दुचाकीवर फोटो मिळाले होते. या फुटेजमधील एका आरोपीसारखा दिसणारा मुलगा कोंड्यामामा चौकात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.