बंगालच्या उपसागरातील दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील किनारपट्टीवर सर्तकेचा इशारा देण्यात आला होता. ओडिशामध्ये 'दाना' चक्रीवादळ हवामान विभागाच्या अंदाजानुसार धमरा आणि भितरकनिकादरम्यान धडकले. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारापासून सकाळी साडेआठपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. वादळानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील स्थिती सामान्य असून, रेल्वे आणि विमानसेवा सुरू झाल्या आहेत.
ओडिशा किनारपट्टीवर तासाला 110 किलोमीटर वेगाने ते धडकले आणि नंतर त्याची तीव्रता कमी झाली. या वादळादरम्यान ओडिशामधील भद्रक जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील चांदबाली येथे 158.6 मिमी पावसाची नोंद झाली. राजकनिका येथे 156 मिमी पावसाची नोंद झाली.
वासुदेवपूर, औपाडा, मर्षाघाई या ठिकाणीही शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. शनिवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भद्रक, बालासोर, मयूरभंज जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.