मुंबईमध्ये मागील 4 दिवसांपासून मुंबई व परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. काल रात्रीपासून सुरू झालेली पावसाची बॅटींग अजूनही सुरू आहे. मुंबई सह ठाणे व मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. तर, भारतीय हवामान खात्याकडून गुजरात (Gujrat), महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईतील काही भागांत वाहतुकीवर परिणाम:
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन, अंधेरी पूर्व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, पाऊस असाच सुरू राहिल्यास मुंबईतील रस्ते वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई लोकलवर काही परिणाम?
सध्या मुंबई लोकल सुरळीतपणे सुरू आहे. परंतु, पाऊसाचा जोर असाच सुरू राहिल्यास मुंबईतील लोकल वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\
मुंबई व्यतिरिक्त आणखी कुठे बरसण्याची शक्यता?
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत, महाराष्ट्रातील अनेक भागांत आज पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता आहे.