गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. आता घटनापीठ याबाबत अंतिम निर्णय काय देणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संबंधित कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर जलिकट्टूविरोधातील याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार उच्च न्यायालयाने 2011 ला बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते.
न्यायालयाने जानेवारीमध्ये जल्लीकट्टू असल्याने या प्रकरणात तत्काळ सुनावणी घेण्यात येईल,असे स्पष्ट सांगितले होते. त्याचवेळी याप्रकरणी वकिलांना अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश देखील दिले होते. त्यानंतर या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.अखेर सर्वोच्च न्यायालयाने अटी व शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे. तामिळनाडूमध्ये जानेवारीत जल्लीकट्टू या साहसी क्रीडा महोत्सव होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत आणि जल्लीकट्टू या क्रीडाप्रकाराविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तामिळनाडू सरकारच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याबाबत विनंती न्यायालयाकडे केली होती.