कुस्तीच्या रिंगमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट यांनी बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या हरियानाच्या विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाटने जुलाना या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आज या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये विनेश फोगाटने बाजी मारत भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला.
विनेशेचा हा विजय फक्त तिच्यासाठीच नव्हे तर काँग्रेससाठीही फार महत्वाचा आहे. कारण गेली 25 वर्षे आणि 5 निवडणुकांमध्ये काँग्रेसला येथून विजय मिळवता आलेला नव्हता. या निवडणुकीत विनेश फोगाट विरोधात भाजपच्या योगेश कुमार यांच्यासह 13 उमेदवार होते. यामध्ये विनेशने पाच हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
दोन महिन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात विनेश फोगाटच गोल्ड मेडल हुकलं होतं. अगदी काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला फायनलचा सामना खेळता आला नव्हता. विनेश ऑलिम्पिक समितीने अपात्र ठरवलं होतं. या निर्णयाला ऑलिम्पिक लवादात आव्हान देण्यात आलं. पण त्याचा फायदा झाला नाही. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह हटवण्यासाठी सुद्धा विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी मोठं आंदोलन केलं होतं.