नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला. देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यावर काँग्रेस सतत आरोप करत असल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला. या दोन्ही उद्योगपतींनी त्यांच्या मेहनतीने प्रगती केली असून, ते फक्त पंतप्रधान मोदी (Narendra Modi) ज्या राज्यातून येतात, त्या गुजरातचे असल्याने त्यांना लक्ष्य करणं योग्य नाही, असं हार्दिक म्हणाले.
हार्दिक पटेल यावेळी म्हणाले, एक उद्योगपती त्याच्या मेहनतीमुळे वर जात असतो. तुम्ही अदानी किंवा अंबानींवर नेहमी खोटे आरोप करु शकत नाही. जर पंतप्रधान गुजरातचे असतील तर त्यामुळे अंबानी आणि अदानींचा राग का असावा? हा फक्त लोकांची दिशाभूल करण्याचा एक मार्ग आहे. पटेल म्हणाले, 'मी माझ्या राजकीय कारकिर्दीची तीन वर्ष काँग्रेस पक्षात वाया घालवली. मी पक्षात नसतो तर गुजरातसाठी अधिक चांगलं काम करू शकलो असतो. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार आरक्षण आंदोलनाचा फायदा काँग्रेसला झाला ही वस्तुस्थिती आहे, मात्र कार्याध्यक्ष बनवूनही मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांनाही मला निमंत्रित करण्यात आलं नाही. गेल्या तीन वर्षात माझ्या पत्रकार परिषदाही आयोजित केल्या गेल्या नाहीत.
दरम्यान, हार्दिक पटेल म्हणाले 33 वर्षांपासून सात-आठ लोक काँग्रेस चालवत आहेत. माझ्यासारखे कार्यकर्ते रोज 500-600 किमी प्रवास करतात. मी लोकांमध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर एसी रूममध्ये बसून मोठे नेते या प्रयत्नात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. पक्षाचे प्रमुख नेते त्यांच्या मोबाईल फोनवर लक्ष केंद्रित करुन असतात, तर गुजरात काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यात व्यस्त असतात असे गंभीर आरोप हार्दिक पटेलने केले.