मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. परंतु, सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय. स्लो ओव्हर रेटमुळं पंड्याला दंड ठोठावण्यात आला. सामन्यासाठी दिलेल्या निश्चित वेळेत मुंबईच्या संघाने संपूर्ण षटके टाकली नाहीत. त्यामुळे पंड्यावर १२ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलीय.
गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला. मुल्लानपूरमध्ये झालेल्या या रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावून १९२ धावा केल्या. त्यानंतर आशुतोष शर्माच्या वादळी खेळीमुळं पंजाब १९.१ षटकात १८३ धावांपर्यंत मजल मारू शकली. परंतु, पंजाबचा निसटता पराभव झाल्यानं मुंबई इंडियन्सने आणखी एका विजयाला गवसणी घातली.
हार्दिक पंड्याला ठोठावला १२ लाखांचा दंड
नर्धारित वेळेत मुंबई इंडियन्सचा संघ संपूर्ण षटके टाकू शकली नाही. संघ एक षटका मागे राहिला. याच कारणामुळे हार्दिकवर कारवाई करण्यात आली. त्याच्यावर मॅच फिजचा १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हार्दिक पंड्याने पुन्हा अशी चूक केली तर, त्याच्यावर २४ लाखांची दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलीय.