देशात सध्या उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) प्रकरणावरून वादळ उठलं आहे. याचदरम्यान ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) वाराणसी कोर्टाला ( Varanasi Court) आज कोणताही आदेश न देण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी आज सुनावणी होणार नसून शुक्रवारी (19 मे) म्हणजे उद्या दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष सहाय्यक आयुक्तांचा अहवाल गुरुवारी वाराणसी न्यायालयासमोर सादर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर नोटीस जारी केली होती. तसेच मशिदीच्या आतील भागात, म्हणजेच त्या ठिकाणी कथित शिवलिंग असल्याचे सांगितले जात होते, त्यावरच हिंदू पक्षकारांचा दावा असल्याचं म्हटलं होतं.
मात्र, या प्रकऱणाने पेट घेतल्यानंतर मशिदीचा परिसर सील करण्यात आला. तरीही मुस्लिमांना मशिदीत प्रवेश करण्यास आणि प्रार्थना करण्यास प्रतिबंध घालून नये, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. तसेच उत्तर प्रदेश सरकारचे वकील अॅड. मेहता यांनी या प्रकरणावर लवकर सुनावणी करण्याची विनंती केली होती. तर, मुस्लिम पक्षकारांची बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ते हुजेफा अहमदी यांनी देशभरात या प्रकरणी खटले दाखल केल्याने आज सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्या. चंद्रचूड यांनी खंडपीठातील इतर न्यायाधीशांसह चर्चा करून शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचे म्हटले.