गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी केली जाणार आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. गुजरातमध्ये भाजपची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 2002 मध्ये होती.त्यावेळी भाजपनं 182 सदस्यांच्या विधानसभेत 127 जागा जिंकल्या होत्या.
गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते.