निसार शेख, चिपळूण: रिफायनरीबाबत सरकार जनतेसोबत असून, येथील जनतेची मते जाणून घेऊन निर्णय घेणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले. खेड येथे दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही जनतेसोबत आहोत. जनतेचे मते समजून कोकणात रोजगार निर्मिती व्हावी. या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. कोकणातील तरुणाच्या हाताला काम मिळावे या दृष्टीने राज्य सरकार पावले उचलत आहे. सरकारकडून मोठे प्रकल्प उभे राहत असताना त्याला पूरक अनेक व्यवसाय संधी निर्माण होत आहेत आणि त्यातूनच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून त्या दृष्टीने निर्णय घेण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री शिवसेना नेते रामदास कदम, गटनेते आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोकणच्या औद्योगिक विकासाबरोबरच औद्योगिक सुरक्षेबाबत देखील खबरदारी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.