घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील 700 मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. आज, 24 मे शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे 6 जून पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असेल. या दुरुस्ती कारणामुळे ठाणे, घोडबंदर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडतात. पावसाळ्यात पाणी साचल्यास कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती केली जाणार आहे. एका यंत्राद्वारे 700 मीटर रस्त्यावर खड्डे खणून तेथे नव्याने खडी टाकली जाणार आहे. त्यानंतर येथे डांबरीकरण केले जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. अखेर शुक्रवारपासून म्हणजेच 24 मेपासून या कामास सुरूवात होणार आहे. या कामाच्या कालावधीत कोंडीची शक्यता असल्याने अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. येथील अवजड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली आहे.