गँगस्टर छोटा राजनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेंबूर येथे काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद पार पडली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांची निवड करण्यात आली.
यावर दीपक निकाळजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, आमचा पक्ष 1990पासून आहे. पण पक्षाची वाढ झाली नाही. त्याची कारणं आम्ही शोधली आहेत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला कुणी युती किंवा आघाडीची ऑफर दिली तर आम्ही आमच्या पक्षाचं हित पाहूनच पुढील निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. आमची ताकद विखुरल्या गेली होती. ती एकत्र करण्याचं आमचं ध्येय आहे. आमच्या पक्षाचे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. असे ते म्हणाले.
यासोबतच आमच्या पक्षाचं हे दहावं राष्ट्रीय अधिवेशन आहे. मी अध्यक्ष झाल्यानंतरचं हे पहिलं राष्ट्रीय अधिवेशन आहे. माझी बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे. आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करावं असे त्यांनी सांगितले.