मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण आणि उत्सवांवर कोणतेही निर्बंध ठेवलेले नाहीत. त्यामुळे ठाण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करूया. त्याचबरोबर, नियमांचे काटेकोर पालन करून आपण हा गणेशोत्सव आर्दश पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पूर्व तयारीबाबत, गुरूवारी महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती, गणेश मंडळे, महापालिका, पोलीस, महावितरण, टोरंट आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
गणेशोत्सव मंडळांच्या सूचना, त्यांना येत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करण्याचं आवाहन देण्यात आलं आहे. मंडळांच्या सूचनांचं निरसन करण्याचं आश्वासन दिलं आहे.