नवी मुंबई, हर्षल भदाणे पाटील : कमी दरात सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून एका व्यवसायिकाची एकोणचाळीस लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना खारघरमध्ये भर दुपारी घडली आहे. मिलिंद वटारे (वय ४९, रा. पुणे) यांनी यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) तक्रार दाखल केली आहे.
मिलिंद वटारे यांना कमी दरात सोन्याचे बिस्कीट देतो, असे सांगून खारघर येथे गुरुदत्त हॉटेलमध्ये घेऊन गेले. व एक किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट दाखवून त्यांच्याकडून एकोणचाळीस लाख रुपये रोख रक्कम घेतली. त्याचवेळी सोन्याचे बिस्कीट न देता पोलिसांची रेड झाली असे भासवून काही अज्ञात इसमांनी त्यांची फसवणूक केली आहे. व सदर रक्कम घेऊन ते पसार झाले. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनोवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादमाने, दौंडकर आणि खारघरचे गुन्हे पोलीस निरीक्षक विमल दिडवे यांनी घटनास्थळी दाखल झाले. या गुन्ह्याचा कसून तपास सुरू आहे. तसेच ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सुद्धा तपासण्यात येत आहे.