सकाळपासूनच वाढणारा असह्य उकाडा आणि सकाळी 11 पासून सायंकाळपर्यंत होणारी लाहीलाही असा अनुभव सध्या मुंबईकरांना येत आहे. उकाड्यातून सुटका होणे दूरच, उलट तो वाढण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत पुढील तीन - चार दिवस कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. वातावरणाच्या उष्णतामानात वाढ होत आहे.
दरम्यान, यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत असून, वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे. या स्थितीत पुढील तीन ते चार दिवस मुंबईत कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी 33 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.