नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाची घसरण होत नसून अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याचे वक्तव्य केले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये एका पत्रकार परिषदेत त्या संबोधित करत होत्या. या परिषदेत एका पत्रकाराने त्यांना भारतीय रुपयाबाबत प्रश्न विचारला होता.
भौगोलिक-राजकीय तणावादरम्यान रुपयाचे लक्षणीय अवमूल्यन झाले आहे. आगामी काळात रुपयासाठी तुम्हाला कोणती आव्हाने दिसत आहेत आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे जाल, असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता.
यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मला रुपयाची घसरण होताना दिसत नाही, पण अमेरिकन डॉलर मजबूत होताना दिसत आहे. डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे साहजिकच ते चलन मजबूत होत असलेल्या तुलनेत रुपया कमकुवत होतील. इतर उदयोन्मुख बाजार चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे. मात्र, रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. एका डॉलरचे मूल्य 82.42 भारतीय रुपया इतके झाले आहे.
अर्थमंत्र्यांनी क्रिप्टोकरन्सीबद्दलही भाष्य केले. सीतारामन म्हणाल्या, आम्ही क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मुद्दे जी-20 देशासमोर चर्चेसाठी आणण्याची इच्छा आहे. जेणेकरून सदस्य त्यावर विचार करू शकतील आणि जागतिक स्तरावर फ्रेमवर्क किंवा एसओपी पोहोचू शकतील.
दरम्यान, अर्थमंत्र्यांना विरोधकांविरोधात ईडीच्या गैरवापरावरही प्रश्न विचारण्यात आला. यावर ईडी पूर्णपणे स्वतंत्र आहे. ते स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.