महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू आणि 100 हून अधिक जखमी झाल्याच्या जवळपास 16 वर्षांनंतर, खटल्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष एनआयए न्यायालय बुधवारपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे.
बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खटल्यात सात आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हे प्रमुख आहेत. मात्र, त्यातील एक समीर कुलकर्णी यांच्यावरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. बचाव पक्षाच्या अंतिम साक्षीदाराची मंगळवारी साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर, पुरावे, कागदपत्रांबाबतची पडताळणी विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के लाहोटी यांनी पूर्ण केली.
मालेगाव येथील मशिदीजवळ 28 सप्टेंबर 206 रोजी मोटारसायकलचा स्फोट होऊन 6 जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. संपूर्ण खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने 323 साक्षीदार तपासले असून त्यापैकी 34 साक्षीदार फितूर झाले आहेत. आरोपींकडून 8 साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी 7 जणांना पुरोहित यांच्यातर्फे पाचारण करण्यात आले होते.