निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून 50 पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र, असं असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे. औरंगाबादमधील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे. मात्र सद्या वेबसाईट चालत नसल्याने अर्ज भरण्यासाठी अडचण येत आहे. त्यातच उद्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावे अशी मागणी इच्छुक उमेदवार यांच्याकडून करण्यात येत आहे. भावी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धरपड सुरु आहे. मात्र त्यातच आता सर्व्हर डाऊन झाल्याने निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी इच्छुक अक्षरशः ऑनलाईन केंद्रावर नंबर लावून बसली आहेत.
'पंचायत महाराष्ट्र इलेक्शन महाराष्ट्र डॉट गव्हरमेंट डॉट इन' ही वेबसाईड हँग होत असल्यामुळे उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता केवळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 तास उरले आहेत. राज्यात सध्या 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे.