नांदेडमध्ये 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेवरुन अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावरच नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आज राज्याच्या मंत्रिमंडळात नांदेडमधील घटनेवर चर्चा झाल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू आहे. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली. नांदेडमधील घटनेचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी राज्याचे दोन मंत्री गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ हे त्या ठिकाणी पोहोचले आहेत.
दरम्यान, रुग्णालयात औषधांचा पुरवठा होत नसल्याने गंभीर समस्यांनी ग्रासलेल्या रुग्णांना जीव गमवावा लागला, असा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे.