लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देणारे 'नारी शक्ती वंदन विधेयक' बहुमताने मंजूर करण्यात आले. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी या निर्णयाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या महिला आघाडीने याबद्दल गणपती बाप्पाची विशेष आरती करून देवाचे आभार मानले.
या आरतीत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या 100 महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या साथीने गणपती बाप्पाची आरती करून हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल देवाचे आभार मानण्यात आले. तसेच त्यासाठी विशेष प्रयत्न करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानून त्याना यश आणि उत्तम दीर्घायुष्य मिळो यासाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांची सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्त्या सौ. शीतल म्हात्रे, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटीका सौ. मीनाक्षी शिंदे तसेच शिवसेनेच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शंभरहुन अधिक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.