आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे.
या दसऱ्या मेळाव्याला मुंबईबाहेरून अधिक गर्दी होण्याची चिन्हे आहेत. खरी शिवसेना कोणाची, यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड केल्याची कागदपत्रे आयोगास सादर करण्यात आली आहेत. शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल, तर ठाकरे यांना दूर करून पक्षप्रमुखपदावर शिंदे यांना दावा करावा लागणार आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलात जोरदार तयारी केली असून, राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडया आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, ‘‘मेळाव्यासाठी आमची जय्यत तयारी असून, हजारो कार्यकर्ते मैदानात व बाहेरही असतील. राज्यभरातून कार्यकर्ते निघण्यास सुरूवात झाली असून, त्यांचा नवी मुंबई व चेंबूरमध्ये मुक्काम आहे. आम्हाला वाहनांची किंवा बसगाडय़ांची व्यवस्था करावी लागली नाही. कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने येत आहेत’’, असे त्यांनी सांगितले.