घोडबंदर येथील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल पोलिसांनी लागू केले असून यानुसार, 11 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत रात्री 12:00 ते पहाटे 4:00 या वेळेत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिका 4 चे काम सुरू आहे. या कामामुळे घोडबंदर गायमुख घाटात वाहतूक कोंडी होत असते. या मेट्रो मार्गिका 4 चे नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप दरम्यान आय आणि यू आकारातील तुळई टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कोणताही अपघात घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल लागू केले आहेत.
या कामादरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना पिलर क्रमांक 85 जवळ प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहने ठाणे वजनकाटा जवळून सेवा रस्ता मार्गे पुढे इंडियन ऑइल पंपासमोर मुख्य रस्त्याने इच्छितस्थळी जातील.