काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हे मंगळवारी तेलंगणात 'भारत जोडो यात्रे'दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. नितीन राऊत यांच्या चेहऱ्याला जबर मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात नितीन राऊत यांच्यावर उपचार झाले आहेत.
नितीन राऊत यांनी घडलेल्या घटनेबद्दल सांगताना म्हणाले, भारत जोडे यात्रेत हैदराबाद येथे मी सहभागी झालो असताना चारमिनार जवळ खूप गर्दी झाली होती. त्या ठिकाणी राहुल गांधी यांचा ताफा आला, तेव्हा पोलिसांनी अचानकच गर्दी नियंत्रण करण्याच्या नावाखाली धक्काबुक्की सुरू केली. तेलंगना पोलिसांच्या एसीपीने माझ्या छातीवर जोरात धक्का मारला आणि त्यामुळे मी रस्त्यावर डोळ्याच्या भारावर पडलो. खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाले मात्र पोलिसांनी मला उचललं नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी मला उचलले आणि दुचाकीवर बसवून मला रुग्णालयात घेउन गेले. रुग्णालयात पोहोचण्याच्यापूर्वीच मला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर अनेक नेत्यांचे फोन आले.
पुढे ते म्हणाले, भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, गर्दी आवरताना पोलिसांनी अशा पद्धतीने सक्ती करू नये, पोलिसांनी संयमाने वागले पाहिजे, जनतेला अशी धक्काबुक्की योग्य नाही असे ते म्हणाले.
डोळ्याला इजा झाली आहे, आतमध्ये छोटा फ्रॅक्चर ही झाला आहे, अजून आठ दिवस मला बरं होण्यासाठी लागतील. त्यामुळे मी भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवेशाच्या वेळेला मी सहभागी होणार नाही, दुसऱ्या टप्प्यात 15 नोव्हेंबर पासून सहभागी होईलस अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गुजरात निवडणुकीवर नितीन राऊतांची प्रतिक्रिया
गुजरातमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनाच प्रचारासाठी उतरावे लागत आहे. गुजरात मधील परिस्थिती काँग्रेससाठी चांगली आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरात मध्ये नेले जात आहे, यावरून भाजप आणि मोदीच्या मनात भीती असल्याचे दिसून येत आहे.