मयुरेश जाधव|कल्याण: केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पुल कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. सोहळा पार पडत नाही तोच या सोहळ्यावरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना ट्विट करत कामाच्या गतीवरून सुनावले आहे. "माझी चमकेश सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमीपुजन करा पण हा पुल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार कसा होईल ते पहा." असे ट्वीट त्यांनी केले आहे.
कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील लोकग्राम पदाचारी पूल पाडून त्याची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून हे काम केले जात आहे. या पुलाच्या कामाचे शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजप व शिंदे गटाचे नेते तसेच पालिका प्रशासन अधिकारी उपस्थित होते. यावेळी या पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या पुलाच्या कामावरून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा चमकेश असा उल्लेख करत टोला लगावला आहे.
काय आहे ट्विट?
गेली अनेक वर्ष रखडलेल्या कल्याण रेल्वे स्थानक येथील लोकग्राम पादचारी पुलाचे आज पुन्हा एकदा जोरात भुमीपुजन झाले. खरंतर जानेवारीत हे काम चालू झाले आहे, परंतु कामाची गती अगदीच मंद आहे. माझी चमकेश सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की पाहिजे तर दर आठवड्याला प्रत्येक खांबाचे भूमीपुजन करा पण हा पुल लवकरात लवकर लोकांच्या सोयीसाठी तयार कसा होईल ते पहा. तुम्हाला पुढील भूमीपुजनासाठी मनसे शुभेच्छा !