ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा प्रकरणात बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे याची ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने तीन दिवस चौकशी केल्याची माहिती समोर आली. गत आठवड्यातच ईडीने ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते. सुरेश कुटे याने ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहात जाऊन कुटेला हे पैसे हाँगकाँगला कसे नेले याबाबत माहिती विचारली. या चौकशीला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
सुरेश कुटे अध्यक्ष असलेली बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये कुटे उद्योग समूहावर पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर अडचणीत आली. 3 लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3 हजार 700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकलेले आहेत. या प्रकरणात 42 गुन्हे नोंद आहेत.
दरम्यान, कुटे हा सातत्याने परदेशातून 10 हजार कोटींची गुंतवणूक येत असून याची प्रक्रिया पूर्ण होताच ठेवीदारांचे पैसे दिले जाणार आहेत असा दावा करत आहे. अटकेनंतरही कुटेच्या वकिलांनी न्यायालयालाही हीच माहिती देऊन हे पैसे येण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी होम अरेस्टची मागणी केली होती.