वादळी खेळी करुन आपल्या संघाला विजयी करण्याचं प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं. टी-२० क्रिकेट सुरु झाल्यापासून चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. प्रत्येक फलंदाज जास्तीत जास्त षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. अशातच कोणत्याही फलंदाजाने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले, तर त्याचं नाव इतिहासाच्या पानात कोरलं जातं. युवराज सिंगने भारतासाठी हा कारनामा केला आहे. आता नेपालचा क्रिकेटर दीपेंद्र सिंगनेही मोठा विक्रम केला आहे. दीपेंद्रने मैदानात षटकारांचा पाऊस पाडला अन् सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दीपेंद्रच्या फलंदाजीचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नेपालचा मध्यमक्रमचा फलंदाज दीपेंद्र सिंग अॅरीने एशियन क्रिकेट काउंसिल मेन्स प्रीमियर कपमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने कतारचा गोलंदाज कामरान खानला एकाच षटकात सहा षटकार ठोकले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली.
दीपेंद्र सिंग अॅरीने युवराज सिंगचा एक मोठा विक्रम मोडला आहे आणि आता आणखी एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने युवराज सिंगचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकल्याचा विक्रम मोडला होता. युवराज सिंगने टी-२० वर्ल्डकप २००७ मध्ये १२ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. परंतु, दीपेंद्रने एशियन गेम्स २०२३ मध्ये ९ चेंडूत ८ षटकार मारून अर्धशतकी खेळी केली होती. आता दीपेंद्रने युवराजच्या सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.