उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं आहे. ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला (Floor Test) सामोरं जावं लागणार हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनातील खंत व्यक्त केली. तसेच महाविकास आघाडीतील सहकारी शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) तसेच सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. मात्र, उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची माहिती शरद पवार यांना नसल्याचं कळतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीच ही आश्चर्यकारक माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळी मला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याचं आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचं सरकार राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले.