मुंबईत आज धर्मवीर या दिवंगत आनंद दिघे यांच्यावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा भव्य दिव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यातील राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी आणि बॉलीवूडचे बडे कलाकार उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यांच्यासहन अनेक अभिनेते होते.
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच यात आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून आनंद दिघेची दमदार व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीचा अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे.
प्रवीण विठ्ठल तरडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. आजवर अनेक दर्जेदार आणि एकाहून एक सरस चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या १३ मे रोजी 'धर्मवीर मु.पो. ठाणे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.