लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बारामतीचा फैसला आजच्या सभेनं या ठिकाणी केलेला आहे. या मंचावर जी शक्ती बसली आहे. जिंकण्याकरता 7 - 8 लाख मत लागतात. पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर 12 - 15 लाख मत तर या मंचावर बसलेली आहेत. त्यामुळे बारामतीला आता कुणीही थांबवू शकत नाही. वहिनींना कुणी थांबवू शकत नाहीत. वहिनी तर आहेतच पण मागच्यावेळेस नंबर 2च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत. नंबर 3चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत. त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत. आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे. मला विश्वास आहे की, या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल. सूनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील. आपण सगळ्यांनी बघितलं. अजितदादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25 - 30 वर्ष सातत्याने मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जाते. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे. हे कोणीच नाकारु शकत नाही.
यासोबतच ते म्हणाले की, मी तुम्हाला एक सांगण्याकरता आलेलो आहे. ही लढाई पवार साहेब विरुद्ध दादा अशी नाही. ही लढाई या ठिकाणी सुनेत्रा ताई विरुद्ध सुप्रिया ताई अशी नाही. की ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची, जिल्हापरिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल? कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ. याचा निर्णय करणारी निवडणूक आहे. या निवडणुकीने पवार साहेब, सुप्रिया ताई हे नेते बनणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजित दादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत. या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचे आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजून उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो. मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील, दादा असतील हे सगळं पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात काम करतो आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत. याठिकाणी दोनच पर्याय आहेत. कुठलेही मत घडाळ्यावर मिळो, धनुष्यबाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जातं. दुसरं कुठलेही मत ते तुतारीवर पडो, पंजावर पडो किंवा मशालीवर पडो ते राहुल गांधींना जाते. आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे. मोदीजींना मत द्यायचे आहे की राहुल गांधींना मत द्यायचं आहे. विकासाला मत द्यायचं आहे की विनाशाला मत द्यायचं आहे हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण या करता नाही आहे की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचे आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, देशामध्ये मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेला विकास आपण बघितला देशातल्या 20 कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी, 55 कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हते त्यांच्या घरी शौचालय देणारं मोदीजी, 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चूलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारं मोदीजी, 60 कोटी लोक ज्यांच्या घरी महिलांना हंडा घेऊन विहीरीवर नाही तर नदीवर जावं लागायचे त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवणारे मोदीजी. या देशामध्ये 80 कोटी लोकांना 2020 पासून मोफत राशन देणारे मोदीजी, तरुणाईला मुद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिनातारण आणि बिना गॅरंटीचे लोन मिळवून देणारे मोदीजी. 85 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये देणारे मोदीजी. या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधून दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचं लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार करणारे मोदीजी. आमचे बारा बलुतेदार ज्यांनी पारंपारिक व्यवसाय केला. त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेनं व्यवसाय करता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी 30 हजार कोटी रुपयांची योजना आणणारे मोदीजी. हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितले पिछले 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे. ही गल्ली बोळ्यातील निवडणूक नाही आहे. या देशाची सुरक्षा कोण करु शकते. गरिबाचा विकास कोण करु शकते. या सगळ्या गोष्टींचा फैसला करण्याची निवडणूक आहे. म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करायला आलो आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे, अजितदादा आम्ही सगळे मिळून एक मजबूत सरकार देतो आहोत. आमच्यासोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे. मोदीजींचा आशीर्वाद आहे, केंद्र सरकारची साथ आहे. त्याचवेळी बारामतीतून देखील तुम्ही 400 पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.