लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज नवनीत राणा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची अमरावतीत जाहीर सभा पार पडली.
या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक अत्यंत चांगली घटना झाली आहे. नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने उत्तर दिलं. आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र वैध ठरवलं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. जे लोकं पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसली आहे. फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काऊंटींगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मतांनी या ठिकाणी खासदार होणार आहेत. याबद्दल आता कोणाच्याही मनात शंका नाही. अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. मी तुम्हाला रवी राणाजी एवढेच सांगतो, जे बोलतात त्यांना उत्तर देऊ नका. अमरावतीने तुम्हाला पाहिलं आहे. त्यामुळे कोणी तुमच्यावर दुषणं दिली तरी देखील चिंता करु नका. केवळ मत मागा, जनतेचं आशीर्वाद मागा, तुमच्या पाठिशी पुण्याई आहे, नवनीत राणा यांच्या पाठिशी पुण्याई आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, नवनीत राणांना तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटले आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागले. या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेंना मला विचारायचं आहे. उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची? हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 तास उभं ठेऊन त्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये ठेऊन एका महिलेला पाण्याविणा, बाथरुमविना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील. हे संपतील पण ते आम्हाला संपवू शकत नाही. हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे.
ही निवडून नवनीत राणा यांची नाही, ही ग्रामपंचायत, महापालिकेची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री कोण असेल? देशाचे नेतृत्व कोण करेल? कोण या देशाला मजबूत करु शकते. याची ही निवडणूक आहे. या देशाच्या जनतेनं ठरवलं आहे. या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची. तिसऱ्यांदा मोदीजींना निवडून देणार आहोत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.