आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलात जोरदार तयारी केली असून, राज्यभरातून चार-पाच हजार एसटी, खासगी बसगाडया आणि हजारो खासगी वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे की, कायद्याच्या पलीकडं जाणून कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेन. राजकारणात एकमेकांवर टीका टिपण्णी होत असते. पण हे कायद्याच्या चौकटीत राहून करावं असे म्हणाले. यासोबतच फडणवीस म्हणाले की, मी नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल आणि दोन्हीकडील कार्यकर्ते देखील कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न करतील असे ते म्हणाले.
खरी शिवसेना कोणाची, यावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढील सुनावणीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणुकीत २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड केल्याची कागदपत्रे आयोगास सादर करण्यात आली आहेत. शिवसेनेवर हक्क सांगायचा असेल, तर ठाकरे यांना दूर करून पक्षप्रमुखपदावर शिंदे यांना दावा करावा लागणार आहे.