अकोल्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज ही घटना घडली आहे. अकोल्यात जोरदार पाऊस सुरु आहे वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसामुळे मंदिरामध्ये आरती सुरू असताना सोसाटाच्या वाऱ्यामुळे 100 वर्ष जुनं झाड अचानक कोसळलं.
या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिरालाच लागून असलेलं 100 वर्ष जुनं लिंबाचं झाड मंदिराच्या टिन शेडवर कोसळलं. अचानक झाड कोसळल्याने संपूर्ण शेड खाली आली आणि त्यात अनेकजण दबले गेले. या सर्वांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावे अशा सूचना दिल्या आहेत. पारसची घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीर आहे. सर्वांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने केला जाईल. तर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात येईल.