Devendra Fadnavis Speech : अरण या ठिकाणी सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा विचार दिला. या वारकरी संप्रदायात ज्यांनी पहिल्यांदा संजीवन समाधी घेतली आणि हे क्षेत्र पावन केलं. अशा या क्षेत्राच्या विकासासाठी आज या ठिकाणी भूमिपूजन झालं. मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवात आज झालीय. या ठिकाणी सावता महाराजांनी खऱ्या अर्थाने कर्मयोग सांगितला. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचं काम हे त्यांच्या शब्दांनी केलं. त्यांच्याजवळ असलेल्या परंपरेने समाजातील विविध लोकांना एकत्र आणून त्यांच्यात भक्तीभाव जागृत झाला पाहिजे. समाज एकसंघ राहिला पाहिजे, अशा प्रकारचा विचार ८०० वर्षापूर्वी ११ व्या शतकात त्यांनी ठेवला, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते माढा तालुक्यातील अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवासाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, अवघ्या ४५ वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं. पण या ४५ वर्षात त्यांनी जे केलं, त्यामुळे ८०० वर्षानंतरही त्यांचे शब्द, विचार प्रासंगिक आहेत. ते समाजाला दिशा आणि गती देतात, हे खऱ्या अर्थाने संतांचं कार्य आहे. म्हणूनच त्यांना नमन करण्यासाठी आपण सर्व लोक एकत्र आलो. या ठिकाणी उर्जा केंद्र तयार करत आहोत. कांदा, मुळा-भाजी अवघी विठाई माझी सांगत असताना किती सोप्या शब्दात आपल्या जीवनाचा अर्थ सावता महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. समाजातील निराशा दूर करून समाज एकसंघ राहिला पाहिजे, समाज भक्तीने ओतप्रोत असला पाहिजे. पण त्याचवेळी समाज समतावानदेखील असला पाहिजे. असमतेचं बीजारोपण दूर झालं पाहिजे.
अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे विचार संत शिरोमणी सावता महाराजांनी मांडले आहेत. त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनाही अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सावता महाराजांमध्ये जी शक्ती होती, ते कधीही पंढरीला गेले नाहीत.पण पंढरीचे विठुराया त्यांच्या मळ्यात आले. हीच भक्तीची शक्ती आहे. इतके युगं झाले, केवळ एका भक्तीसाठी विठुराया एका विटेवर उभे आहेत. त्यामुळे आपल्या भक्ताची काळजी घेणारी विठू माऊली या ठिकाणी अरणमध्ये खऱ्या अर्थाने सावता महाराजांच्या मळ्यात आली, असंही फडणवीस म्हणाले.