Devendra Fadnavis On India Alliance : इंडिया आघाडीत फक्त इंजिन आहे, डब्बे नाही. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे. तिकडे सर्व इंजिन आहेत. इंजिनमध्ये जनता बसू शकते का, इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर आणि त्यांचा परिवार बसू शकतो. त्यांच्या इंजिनमध्ये तुम्हाला बसायची जागा नाही. संजय काकांच्या प्रचारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेल्या सर्वांना पाहून माझ्या मनात कोणतीही शंका उरली नाही. संजय काकांची हॅट्ट्रिक पक्की आहे. आता किती मताधिक्क्यानं विक्रमी नोंद करता, हेच पाहायचं आहे. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर तोफ डागली. ते सांगली येथे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, विकासाच्या गाडीला मोदींचं इंजिन आहे. प्रत्येक पक्षाचा डबा त्याला लागला आहे. या डब्यात सामान्य माणसाला बसायची जागा आहे. शेतकरी, आदिवासी, दिनदलित, गोरगरिब, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक सर्वांना आमच्या गाडीत बसायची जागा आहे. त्यांचं इंजिन पुढं जात नाही, ते इंजिन हालत नाही, डुलत नाही. ते चालत नाही, ते ठप्प पडलेलं इंजिन आहे. त्यामुळे संजय काका मोदींच्या इंजिनसोबत डब्बा घेऊन सांगलीकरांना त्या डब्ब्यात बसवून विकासाकडे घेऊन चालले आहेत. सांगलीकरांनो, तुमचा आशीर्वाद काकांच्या पाठिशी आपल्याला ठेवायचं आहे.
गेल्या दहा वर्षात मोदींनी भारताला बदललं. गरिब कल्याणाचा अजेंडा भारतात चालला. देशात २० कोटी लोक झोपडीत राहायचे, त्यांना पक्के घर मिळाले. ज्यांच्या घरी गॅस नव्हता, त्यांना गॅस मिळाला. देशातील ५५ कोटी लोकांना आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखांचा उपचार मोफत दिला. समाजातल्या प्रत्येक वर्गाला विकासाकडे नेण्याचं काम मोदींनी केलं.
ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पुढील पाच वर्षे कोणाच्या हातात भारत देश द्यायचा, त्यासाठी ही निवडणूक आहे. दोनच पर्याय आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या नेतृत्वात एनडीए आणि महायुती आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आहे. तसच इतर घटक पक्षही आहेत. हे सर्व पक्ष मिळून आपण एक मोठी आघाडी केली आहे. राहल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्ष एकत्र आले आहेत. पण यात फरक आहे. आपली विकासाची गाडी आहे, असंही फडणवीस म्हणाले.